प्रतिनिधी : शाम जगताप
पुणे : आगामी बकरी ईद सण शांततेत व उत्साहात पार पडावा तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व आंबेगाव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. २७ मे २०२६) सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत कात्रज परिसरात भव्य रूट मार्च काढण्यात आला.
या रूट मार्चद्वारे पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा निर्धार व्यक्त करत नागरिकांना शांतता व सौहार्द जपण्याचे आवाहन केले. संवेदनशील भागांमध्ये विशेष दक्षता घेत पोलिसांनी परिसराची पाहणी केली.
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने तसेच भारती विद्यापीठ व आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पोलीस अंमलदार उपस्थित होते.
रूट मार्चची सुरुवात कात्रज पोलीस चौकी येथून करण्यात आली. त्यानंतर डी लाईट बेकरी, जामा मस्जिद, भगवा चौक, दिग्विजय मित्र मंडळ, कात्रज भाजी मंडई, किनारा हॉटेल, महादेव मंदिर, कात्रज तलाव, भैरवनाथ मंदिर, कात्रज गावठाण मार्गे कात्रज चौक येथे रूट मार्चची सांगता करण्यात आली.
या मोहिमेत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडून १ पोलीस निरीक्षक, ४ सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक व ३५ अंमलदार सहभागी झाले होते. तसेच आंबेगाव पोलीस स्टेशनकडून २ पोलीस निरीक्षक, ५ सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक व ३० अंमलदारांचा सहभाग होता.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या रूट मार्चमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, सण शांततेत साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.




