पतीकडून पत्नी व सासूला कोयत्याचा धाक दाखवत मारहाण; भावाची सोन्याची चैन तोडून पसार

शिरूर : शिरूर शहरातील बाबुराव नगर परिसरात कौटुंबिक वादातून एका महिलेसह तिच्या आईला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रणाली सुनील घावटे (वय 26, रा. सध्या बाबुराव नगर, शिरूर) या आपल्या आईच्या घरी वास्तव्यास होत्या. दरम्यान, 25 मे 2026 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे पती सुनील सुरेश घावटे हे तेथे आले. त्यांनी पत्नीला जबरदस्तीने “आत्ताच्या आता माझ्यासोबत घरी चल” असे सांगत हातातील लोखंडी कोयता दाखवून धाकदपटशा केल्याचा आरोप आहे.
यावेळी फिर्यादी महिला व त्यांच्या आई मनिषा यांना हाताने मारहाण करण्यात आली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, घरातील वाद मिटवण्यासाठी फिर्यादीचा भाऊ प्रतिक हा मध्ये पडला असता आरोपीने त्याच्यासोबत धक्काबुक्की केली. त्याच्या गळ्यातील अर्धा तोळे वजनाची सोन्याची चैन तोडून त्यातील अर्धी चैन घेऊन आरोपी तेथून पसार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार कोथळकर करत आहेत. प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *