पुणे, प्रतिनिधी : रमेश बनसोडे
हवेली तालुक्यातील साष्टे परिसरात शेतजमिनीत जेसीबी घालून ऊस पीक, फळबाग तसेच ठिबक सिंचन व्यवस्थेची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत दिपाली किरण साळुंके (वय ४०, रा. साळुंके वस्ती, कोलवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित मोडक (रा. हडपसर, पुणे) व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शेतजमिनीत जेसीबी घालून सुमारे ६० गुंठे ऊस पीक उद्ध्वस्त केले. याशिवाय शेतातील २०० सिताफळ झाडे, ३० आंब्याची झाडे, १० नारळाची झाडे तसेच ४ सागाची झाडे तोडून मोठे नुकसान करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याचबरोबर शेतातील ठिबक सिंचन व्यवस्था, पाईपलाईन, वीज कनेक्शन आणि शेतावरील नावाचा फलक यांचीही तोडफोड करण्यात आली. घटनेदरम्यान फिर्यादीचा मोबाईल हिसकावून घेणे, शिवीगाळ करणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे साष्टे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेती व शेतमालाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लोणीकंद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




