Rjnews27 मराठी – रमेश बनसोडे
डोंगरगण येथे रम्मी जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर तालुक्यातील डोंगरगण गावात सुरू असलेल्या रम्मी जुगार अड्ड्यावर शिरूर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली असून पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 443/2026 नुसार महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शंकर विष्णु बल्लाळ यांनी फिर्याद दिली आहे. ते शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र येथे कार्यरत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 3.20 वाजण्याच्या सुमारास डोंगरगण गावातील भैरवनाथ पशुखाद्य दुकानासमोर काही जण पैसे लावून रम्मी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता आरोपी नागेश चांदा चोरे (वय 55, रा. डोंगरगण, ता. शिरूर) हा जुगार खेळताना आढळून आला. तर त्याच्यासोबत असलेले रवी सुरेश सदाफुले, राजू चोरे, विनायक व बाबाजी पवार हे पोलीस व पंचांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पळून गेले.
घटनास्थळावरून पोलिसांनी 52 पत्यांचे दोन कॅट तसेच भारतीय चलनातील 300 रुपये रोख रक्कम असा एकूण 320 रुपयांचा जुगार साहित्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रम्मी नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची नोंद 17 मे 2026 रोजी सायंकाळी 6.21 वाजता करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार उबाळे करीत आहेत. या कारवाईत पोलीस हवालदार शिंदे यांनी दाखल अंमलदार म्हणून काम पाहिले असून शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.




