नागरगावात ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती शेड फोडून तब्बल अडीच लाखांच्या कॉपर वायरची चोरी

प्रतिनिधी – विजय कांबळे 

शिरूर तालुक्यातील नागरगाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या शेडवर डल्ला मारत तब्बल २ लाख ४७ हजार रुपयांच्या कॉपर वायरची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील व्यावसायिक आणि शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागरगाव येथील “वेदांत इलेक्ट्रॉनिक अँड ट्रान्सफॉर्मिंग रिपेअरिंग वर्क्स” या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या कॉपर एल.व्ही. वाइंडिंगच्या तांब्याच्या तारांवर चोरट्यांनी हात साफ केला. ही घटना शुक्रवार दिनांक १६ मे २०२६ रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
फिर्यादी एकनाथ रमेश शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चार इसमांनी शेडमधील ट्रान्सफॉर्मर पत्रे उचकावून आत प्रवेश केला आणि सुमारे २२५ किलो वजनाच्या १५ गोलाकार कॉपर कॉईल चोरी करून नेल्या. प्रत्येकी अंदाजे १५ किलो वजन असलेल्या या कॉईलची एकूण किंमत सुमारे २ लाख ४७ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
चोरीची घटना लक्षात आल्यानंतर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. घटनास्थळी पाहणी करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयित हालचाली आणि वाहनांची माहिती तपासली जात आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मर आणि कॉपर वायर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः औद्योगिक साहित्य, विद्युत साहित्य आणि कॉपर साहित्य चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *