दौंड, प्रतिनिधी :विकास साळुंके
सहजपूर फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परमीट रूममध्ये जेवणादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीनंतर तिघांनी मिळून एका युवकाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून यवत पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ११ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच ते पावणेसहा वाजण्याच्या सुमारास सहजपूर फाटा (ता. दौंड, जि. पुणे) येथील ओअसीस हॉटेलमध्ये घडली. दयानंद विश्वनाथआप्पा भुरके हे आपल्या मित्र अक्षय निगडे व पुतण्या धनराज शिवाजी भुरके (वय ३९, रा. अंबुलगा मेन, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्यासोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते.
दरम्यान, धनराज भुरके हे बाथरूमकडे जात असताना समोरील टेबलावर बसलेल्या काही व्यक्तींना त्यांचा धक्का लागल्याचे सांगण्यात येत आहे. या किरकोळ कारणावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर काही क्षणांतच हाणामारीत झाले. आरोपींनी धनराज भुरके यांना हाताने, लाथाबुक्यांनी तसेच खुर्चीने मारहाण केल्याचा आरोप आहे.
या मारहाणीत धनराज भुरके गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी माऊली पांडुरंग जाधव, विशाल मारुती धेंडे (दोघे रा. ऊरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) तसेच नवाज रियाज तांबोळी (रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे) यांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.




