आदर्श प्राचार्य व्ही. डी. खामकर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात
पाटस प्रतिनिधी- योगेश राऊत

पाटस, प्रतिनिधी : कै. एम. व्ही. भागवत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे आदर्श प्राचार्य व्ही. डी. खामकर सर यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित गौरव समारंभ बुधवारी (दि. 29 एप्रिल) विद्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल 29 वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि विद्यार्थीहिताच्या शैक्षणिक सेवेनंतर खामकर सर 31 मे 2026 रोजी सन्मानपूर्वक सेवानिवृत्त होत आहेत.

कार्यक्रमास गुरुकुल शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव व शाळा समितीचे उपाध्यक्ष हनुमंतराव देवकाते अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य खामकर सर, त्यांच्या कुटुंबीय व मान्यवरांच्या आगमनाने झाली. यावेळी विद्यार्थिनींनी औक्षण करून पुष्पवृष्टीद्वारे त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
विद्यालयाचे प्राध्यापक एस. जी. लोंढे यांनी खामकर सरांचा जीवनपट उलगडून सांगितला. विद्यार्थिनी दुर्वा गरडकर, सादिया शेख, पानसरे आदींनी मनोगत व्यक्त करत खामकर सरांची सेवा आणखी काही वर्षे वाढावी, अशी भावना व्यक्त केली.

शिक्षिका सौ. श्वेता राखी यांनी आपल्या भाषणात खामकर सरांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, ते सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत विद्यालयात कार्यरत राहत. त्यांनी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत गणित विषयाचे अध्यापन केले. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जादा तास, तसेच पाचवी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग घेतले. शाळेच्या वेळेनंतरही विविध ऑनलाइन कामे पूर्ण करत त्यांनी विद्यालयाच्या प्रगतीसाठी अविरत परिश्रम घेतले.
प्राचार्य म्हणून दोन वर्षांच्या कालावधीत खामकर सरांनी वर्गखोल्यांचे रंगकाम, प्लास्टर, दरवाजे-खिडक्या बसविणे, नवीन जिना उभारणे, शालेय परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे यांसारखी भौतिक सुविधांची मोठी कामे पूर्ण केली. त्यांच्या नेतृत्वामुळे विद्यालयाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलल्याचे शिक्षकांनी नमूद केले.
माजी विद्यार्थी श्री. शिंदे व नितीन म्हस्के यांनी खामकर सरांनी गणित विषय सोपा करून शिकविल्याच्या आठवणी सांगितल्या. सौ. धायगुडे मॅडम यांनी कवितेद्वारे खामकर सरांच्या कार्याला अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांनी खामकर सरांना फेटा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. आपल्या भाषणात त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खामकर सरांनी विद्यालयाची केलेली प्रगती प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र राज्य टीडीएफचे अध्यक्ष जी. के. थोरात, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी माणिकराव किसन बिचकुले, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, माजी मुख्याध्यापक बी. बी. अर्जुन, प्राचार्य दत्तू इवरे, बी. डी. शितोळे, ज्येष्ठ शिक्षक भानुदास नेवसे, दादा लोणकर आदी मान्यवरांनी खामकर सरांच्या नेतृत्वगुणांचा व शैक्षणिक योगदानाचा गौरव केला.
प्राचार्य खामकर सर यांच्या पत्नी सौ. मनीषा खामकर यांनी सरांच्या 29 वर्षांच्या सेवाकाळाचा आढावा घेत त्यांच्या कार्याबद्दल समाजात होत असलेल्या कौतुकाचा उल्लेख केला.
आपल्या मनोगतात प्राचार्य व्ही. डी. खामकर यांनी शिक्षक ते प्राचार्य असा प्रवास सांगताना, “मी घडवलेले विद्यार्थी हेच माझ्या कार्याचे खरे यश आहे. विद्यार्थी हेच माझे दैवत असून त्यांच्या यशातच मला माझे आयुष्य सापडले,” अशी भावनिक भावना व्यक्त केली. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष सोनवणे गुरुजी, सहसचिव हनुमंतराव देवकाते तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात हनुमंतराव देवकाते यांनी खामकर सरांनी प्राचार्य म्हणून केलेल्या कार्याचे कौतुक करत विद्यालयाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी संस्थेच्या वतीने खामकर सरांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक, माजी विद्यार्थी व विविध मान्यवरांनीही त्यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. एन. कोळेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रांधवन यांनी मानले.
समारंभास सत्वशील भाऊ शितोळे, शिवाजी बापू ढमाले, अरुण मारुतराव भागवत, अरुण लक्ष्मण भागवत, प्रशांत तात्या शितोळे, बाळासाहेब भागवत, सोनवणे गुरुजी, डॉ. मधुकर आव्हाड, सागर शितोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी व पाटस पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




