कै. एम. व्ही. भागवत विद्यालयाचे आदर्श प्राचार्य व्ही. डी. खामकर सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न
२९ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला मानाचा मुजरा; विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांकडून भावपूर्ण गौरव पुणे विजय कांबळे

नागरगावं – येथील कै. एम. व्ही. भागवत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे आदर्श प्राचार्य श्री व्ही. डी. खामकर सर यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित गौरव समारंभ बुधवारी (दि. २९ एप्रिल २०२६) विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.
खामकर सर यांनी तब्बल २९ वर्षांच्या समर्पित सेवेनंतर ३१ मे २०१६ रोजी सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य खामकर सर व त्यांच्या कुटुंबियांच्या आगमनाने झाली. यावेळी विद्यार्थिनी व शिक्षकांनी औक्षण करून पुष्पवृष्टीद्वारे त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी गुरुकुल शिक्षण संस्थेचे सहसचिव व शाळा समितीचे उपाध्यक्ष मा. श्री हनुमंतराव देवकाते होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रास्ताविकात प्रा. श्री एस. जी. लोंढे यांनी खामकर सरांचा जीवनप्रवास उलगडला. विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून खामकर सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या सेवेला आणखी मुदतवाढ मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिक्षिका सौ. श्वेता राखी यांनी आपल्या मनोगतात खामकर सरांच्या कार्याचा गौरव करत सांगितले की, त्यांनी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत विद्यालयात राहून अध्यापन व प्रशासनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. गणित विषय सोप्या पद्धतीने शिकवणे, अतिरिक्त तास घेणे, तसेच विद्यालयाच्या भौतिक सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करणे हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले.
माजी विद्यार्थी श्री शिंदे व श्री नितीन म्हस्के यांनी खामकर सरांनी गणित विषय सुलभ केल्याचे सांगत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सौ. धायगुडे मॅडम यांनी कवितेद्वारे शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. रमेश आप्पा थोरात यांनी फेटा, शाल व श्रीफळ देऊन खामकर सरांचा सत्कार केला. आपल्या भाषणात त्यांनी खामकर सरांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगत समाजकार्यासाठी पुढेही योगदान देण्याचे आवाहन केले.
तसेच महाराष्ट्र राज्य टीडीएफचे अध्यक्ष मा. जी. के. थोरात, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री माणिकराव बिचकुले यांसह विविध मान्यवरांनी खामकर सरांच्या नेतृत्व, कर्तृत्व व शैक्षणिक योगदानाचा गौरव केला.
खामकर सरांच्या पत्नी सौ. मनीषा खामकर यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेत कुटुंबीयांचा अभिमान व्यक्त केला.
आपल्या मनोगतात प्राचार्य खामकर सरांनी सांगितले की, “मी घडवलेले विद्यार्थी हेच माझ्या कार्याचे खरे यश आहे. विद्यार्थी हेच माझे दैवत असून त्यांच्या यशातच मला समाधान मिळते.”
अध्यक्षीय भाषणात मा. हनुमंतराव देवकाते यांनी खामकर सरांच्या कार्याचे कौतुक करून विद्यालयाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी संस्थेच्या वतीने खामकर सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक व मान्यवरांनीही त्यांचा सन्मान केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. एन. कोळेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रांधवन सर यांनी केले.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्य खामकर सरांच्या सेवेला दिलेला हा मानाचा मुजरा उपस्थितांच्या मनात कायम स्मरणात राहणारा ठरला.




