ऊसतोड मजूर पुरवठ्याच्या नावाखाली २४.३८ लाखांची फसवणूक; तिघांविरोधात शिरूर पोलिसांत गुन्हा

नागरगाव (ता. शिरूर) | प्रतिनिधी – विजय कांबळे
ऊसतोड मजूर पुरवठा करण्याचे आमिष दाखवत साखर कारखान्याची तब्बल २४ लाख ३८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी तिघांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राहुल रामदास भाकरे (वय ३६, रा. माळवाडी, टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. भाकरे हे ‘पराग अॅग्रो फूड्स अँड अलाइड प्रॉडक्ट्स प्रा. लि.’ या रावडेवाडी येथील साखर कारखान्याशी संबंधित आहेत.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ जुलै २०२५ रोजी सकाळी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास रावडेवाडी (ता. शिरूर) येथील कारखान्यात आरोपींनी ऊसतोड मजूर पुरवण्याचे खोटे आश्वासन देत लेखी करार केला. त्यानंतर विश्वास संपादन करून तिघांनी संगनमताने विविध रकमा आपल्या बँक खात्यावर जमा करून घेतल्या.
यामध्ये गोरख भारमल राठोड यांनी ८ लाख १८ हजार रुपये, नितीन तुळशीराम चव्हाण यांनी ४ लाख ८६ हजार रुपये, तर ज्ञानेश्वर गबरू राठोड यांनी ११ लाख ३४ हजार रुपये असे एकूण २४ लाख ३८ हजार रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र, प्रत्यक्षात मजूर पुरवठा न करता कारखान्याची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी गोरख भारमल राठोड, नितीन तुळशीराम चव्हाण व ज्ञानेश्वर गबरू राठोड (सर्व रा. घोडेगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार जाधव यांनी केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई पवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *