पहिली कमाई गुरूंच्या चरणी; कु. अर्णवी महाडिकच्या संस्कारपूर्ण कृतीने गुरू-शिष्य परंपरेचा उज्ज्वल आदर्श

प्रतिनिधी – शाम जगताप
हवेली (पुणे) दि. ११ एप्रिल :
आजच्या स्पर्धात्मक युगात यशाच्या मागे धावणाऱ्या तरुण पिढीत संस्कार आणि कृतज्ञतेची जाणीव जपणारे प्रसंग क्वचितच पाहायला मिळतात. मात्र हवेली तालुक्यातील शिंदवणे येथील श्री छत्रपती संभाजी महाराज कुस्ती संकुलात घडलेल्या एका प्रेरणादायी घटनेने गुरू-शिष्य परंपरेचा सुंदर आदर्श समाजासमोर ठेवला आहे. कु. अर्णवी भाऊसाहेब महाडिक हिने कुस्तीच्या आखाड्यातून मिळालेली आपल्या आयुष्यातील पहिली कमाई आपल्या वस्तादांच्या चरणी अर्पण करत कृतज्ञतेचा अनोखा संदेश दिला.
शिंदवणे यात्रेनिमित्त भरलेल्या कुस्तीच्या आखाड्यात अर्णवीने मेहनतीच्या जोरावर पहिली कमाई मिळवली. ही रक्कम तिने स्वतःकडे न ठेवता थेट आपल्या गुरू वस्ताद पैलवान शरद महाडिक यांच्या चरणी अर्पण केली. “आज मी जे काही आहे ते माझ्या गुरूंमुळेच,” अशी भावना व्यक्त करत तिने गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली. या भावनिक क्षणाने उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
कुस्ती हा केवळ खेळ नसून शिस्त, जिद्द आणि संस्कार यांचा संगम मानला जातो. आखाड्यातील गुरू शिष्यांना केवळ डावपेच शिकवत नाहीत, तर आयुष्य घडवणारे संस्कारही देतात. अर्णवीच्या कृतीतून याच परंपरेची प्रचिती आल्याने उपस्थितांनी तिच्या संस्कारांचे मनापासून कौतुक केले.
यावेळी आदर्श शिक्षक व ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब महाडिक, शिंदवणेचे माजी उपसरपंच संभाजी महाडिक, हवेली तालुका शिवसेनेचे माजी उपविभागप्रमुख व संचालक युवराज महाडिक, पत्रकार अमोल महाडिक, सागर नाईकवाडे तसेच ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अर्णवीच्या संस्कारपूर्ण कृतीचे मनापासून स्वागत करत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
“आजच्या काळात पैशाला जास्त महत्त्व दिले जाते; मात्र कु. अर्णवी महाडिक हिने पैशापेक्षा संस्कार आणि कृतज्ञतेला प्राधान्य दिले, ही गोष्ट समाजासाठी प्रेरणादायी आहे,” असे मत माजी उपसरपंच संभाजी महाडिक यांनी व्यक्त केले.
अर्णवी ही आदर्श शिक्षक व ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब महाडिक यांची कन्या असून क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भाऊसाहेब महाडिक यांनी मास्टर्स गेम्स असोसिएशन आयोजित राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकून राष्ट्रीय खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला आहे. तसेच अर्णवीने शिंदवणे गणेश फेस्टिव्हलमध्ये सलग दोन वर्षे नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत आपल्या कलागुणांची छाप पाडली आहे. तिचा सत्कार राज्याचे उपमुख्यमंत्री सुनित्राताई अजित पवार, अभिनेते संजय खापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाडिक, तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर तसेच माजी सरपंच व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला होता.
कु. अर्णवी महाडिक हिच्या या संस्कारपूर्ण कृतीमुळे समाजात गुरूंचा सन्मान करण्याची प्रेरणा निर्माण झाली असून, पारंपरिक कुस्ती संस्कृतीतील गुरू-शिष्य नात्याची महती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *