सासवड : पुरंदर तालुक्यातील सासवड येथील विद्यार्थ्याने आपल्या लेखनकौशल्याच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करत शाळा आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. म. ए. सो. वाघिरे हायस्कूल, सासवड येथील इयत्ता सहावी तुकडीतील विद्यार्थी कु. विश्वजीत आप्पा भांडवलकर यांनी “संवादलेखन” हा लेख अत्यंत उत्कृष्ट आणि प्रभावी पद्धतीने लिहून विशेष यश संपादन केले आहे.
विश्वजीत यांच्या या लेखाची निवड “माध्यमिक शिक्षणविवेक” या शैक्षणिक पुस्तकाच्या एप्रिल 2026 च्या अंकात (वर्ष चौदावे) करण्यात आली असून तो लेख पृष्ठ क्रमांक 12 वर प्रकाशित होणार आहे. विद्यार्थीदशेतच लेखन क्षेत्रात मिळवलेले हे यश विशेष मानले जात असून शाळा व तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे कु. विश्वजीत भांडवलकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशामागे शाळेतील शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन, अभ्यासू वृत्ती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी म. ए. सो. वाघिरे हायस्कूलकडून केले जात असलेल्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे हे फलित असल्याचेही मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व मित्रपरिवार यांनी कु. विश्वजीत भांडवलकर यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे पुरंदर तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, सासवड शहरासाठीही ही गौरवास्पद बाब ठरली आहे. लहान वयातच लेखनक्षेत्रात मिळालेल्या या यशामुळे भविष्यातही विश्वजीत मोठे यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





