हिंगणी दुमाला (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर)
प्रतिनिधी -:अल्लाउद्दीन अलवी

श्रीगोंदा तालुक्यातील टोकाच्या भागात असलेल्या हिंगणी दुमाला गावात श्री खंडोबा यात्रेचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. या यात्रेनिमित्त बगाड मिरवणूक, भंडारा उधळण, छबिना आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
यात्रेच्या पहिल्या दिवशी दि. ७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५ ते ७ वाजेपर्यंत श्री खंडोबा देवाची अभिषेक महापूजा पार पडली. ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून “खंडोबा भानाईच्या नावानं चांगभलं, येळकोट येळकोट जय मल्हार” अशा जयघोषात भंडारा आणि खोबरे उधळून भक्तांनी देवाच्या नावाचा गजर केला. या वेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायंकाळी ४ वाजता पारंपरिक बगाड मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थांच्या वतीने मानाच्या बैलांचे पूजन वाखारे परिवाराच्या बैलांचे गावचे सरपंच दत्तात्रय वाखारे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीने बगाडाची ओवाळणी व पूजा केली.
यानंतर ग्रामस्थांनी आपल्या बैलजोड्या बगाडाला जुंपत यात्रेला पारंपरिक रंगत आणली. या मिरवणुकीत विशेष आकर्षण ठरले ते कै. अहमद शेख यांचे नातू इरफान अल्ताफ शेख यांच्या ‘सोन्या-मोन्या’ बैलजोडीचे. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
रात्री १० वाजता छबिना व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थ व पाहुण्यांच्या करमणुकीसाठी मालती इनामदार यांच्या लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमालामोठी गर्दी झाली.
यात्रेच्या तिसऱ्या दिवशी ९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता हजेरी कार्यक्रम होणार असून दुपारी ४ नंतर राज्यातील नामांकित पैलवानांचा जंगी कुस्ती आखाडा आयोजित करण्यात आला आहे. या आखाड्यासाठी परिसरातील कुस्तीप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
ही यात्रा गावातील धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि ग्रामएकतेचे प्रतीक असून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.





