शिरूर (ता.७) – शिरूर उपविभागीय महावितरण कार्यालयाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तांदळी (ता. शिरूर) येथील सुपुत्र संजय तावरे यांनी २०२५–२०२६ या आर्थिक वर्षात कृषी वीज देयक वसुलीत तब्बल ११७.५९ टक्के विक्रमी वसुली करत उल्लेखनीय कामगिरी बजावल्यामुळे त्यांना “गुणगौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
महावितरणच्या मांडवगण फराटा विभागांतर्गत बाभुळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला तसेच शिरूर उपविभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात संजय तावरे यांनी अविरत परिश्रम घेत वसुलीचे उद्दिष्ट गाठलेच नाही तर त्यापेक्षाही जास्त कामगिरी करून दाखवली. त्यांच्या या कामगिरीमुळे महावितरण कंपनीसमोर एक आदर्श निर्माण झाला असल्याची भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
शिरूर उपविभागीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कार्यकारी अभियंता शरद माने यांच्या हस्ते संजय तावरे यांना शाल, श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता आल्हाट, उपकार्यकारी अभियंता माने, सहाय्यक अभियंता गोरे तसेच मांडवगण फराटा येथील कनिष्ठ अभियंता इरशाद शेख यांच्यासह महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना संजय तावरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “महावितरणने दिलेले वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करताना कनिष्ठ अभियंता इरशाद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने काम केले. अनेक वेळा रात्री-अपरात्री किंवा पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाला तरी तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकरी पंपधारकांचा विश्वास जिंकता आला आणि त्यांनी वेळेत वीज देयक भरून सहकार्य केल्यामुळे ही कामगिरी शक्य झाली.”
बाभुळसर बुद्रुक व गणेगाव दुमाला परिसरातील शेतकरी वर्गाच्या सहकार्यामुळेच हा विक्रम घडल्याचेही त्यांनी नमूद केले. संजय तावरे यांच्या या कामगिरीमुळे महावितरणच्या कार्यपद्धतीला बळ मिळाले असून त्यांच्या सन्मानाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





