देऊळगाव राजे येथे सिद्धेश्वर मंदिरातून चांदीचा मुकुट चोरी
पाटस प्रतिनिधी – योगेश राऊत
दौंड, दि. ५ (प्रतिनिधी) – तालुक्यातील देऊळगाव राजे येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर महाराज मंदिरातून चांदीचा मुकुट चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ एप्रिल रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मंदिरातील काचेच्या कपाटात ठेवलेला सुमारे ३ किलो वजनाचा व अंदाजे १ लाख ९५ हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या मुकुटावर नागाच्या फणीची आकृती व खडे बसवलेले होते.
फिर्यादी भानुदास रामदास औताडे (वय ७५), हे मंदिराची देखरेख करीत असून त्यांनी याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात चोरट्याने कपाटाचा दरवाजा कशाच्यातरी सहाय्याने उघडून ही चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २०९/२०२६ नोंद करण्यात आला असून BNS कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी पाहणी करून पोलीसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विनोद चव्हाण करत आहेत.
दरम्यान, मंदिरातील दागिने चोरीस जाण्याच्या वाढत्या घटनांमुळे भाविकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मंदिर प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.




