केडगाव-वखारी येथे ग्रामदैवत हजरत पीर साहेब यांची वार्षिक यात्रा उत्साहात संपन्न
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव-वखारी येथील ग्रामदैवत हजरत पीर साहेब यांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यात्रेनिमित्त परिसरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गावासह आसपासच्या भागातून हजारो भाविकांनी हजरत पीर साहेबांच्या दरग्यावर येऊन दर्शन घेत आशीर्वाद घेतला.
यात्रेची सुरुवात पारंपरिक धार्मिक विधी आणि दरग्यावर चादर अर्पण करून करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि “पीर साहेब की जय” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. गावातील नागरिक, भाविक व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांच्या लोकनाट्य तमाशा कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन केले. तसेच यात्रेचा पारंपरिक भाग मानला जाणारा इंगळ हा धार्मिक कार्यक्रमही मोठ्या भक्तिभावाने पार पडला. या वेळी हजारो भाविकांनी श्रद्धेने अग्नीकुंडातून चालत आपली भक्ती व्यक्त केली.
यात्रेमुळे गावातील वातावरण पूर्णतः उत्सवी झाले होते. परिसरात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळणी, स्टेशनरी दुकाने तसेच पाळणे यामुळे यात्रेची रंगत आणखी वाढली होती. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनाही मोठा आर्थिक फायदा झाला.
गावातील ग्रामस्थ, यात्रा समिती तसेच प्रशासनाच्या सहकार्याने संपूर्ण यात्रा शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
— विकास साळुंके
दौंड तालुका प्रतिनिधी, आरजे न्यूज २७ मराठी





