शेतकऱ्यांच्या हक्कासाठी करडे येथे रास्ता रोको आंदोलन; दिवसा आठ तास वीजपुरवठ्याची जोरदार मागणी

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी करडे येथे रास्ता रोको आंदोलन; दिवसा आठ तास वीजपुरवठ्याची जोरदार मागणी

Rjnews27 मराठी 

करडे, ता. शिरूर : बिबट प्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जीविताचा प्रश्न गंभीर बनला असून, रात्रीच्या वेळी शेतीपंपांसाठी दिल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवसा किमान आठ तास वीजपुरवठा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर ग्रामीण–न्हावरा जिल्हा परिषद गटाचे नेते श्री. बबनराव वाळके यांच्या नेतृत्वाखाली रा.मा. ११८ शिरूर–चौफुला–सुपा–सांगवी मार्गावरील करडे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 

महावितरणच्या शिरूर उपविभागांतर्गत येणाऱ्या परिसरात सध्या शेतकऱ्यांना रात्री ९.४५ ते पहाटे ३.४५ वाजेपर्यंत केवळ सहा तास वीजपुरवठा करण्यात येत आहे. या वेळापत्रकामुळे शेतकऱ्यांना मध्यरात्रीच्या सुमारास शेतीपंप सुरू करण्यासाठी शेतात जावे लागत आहे. विशेषतः हा परिसर बिबट प्रवण असल्याने शेतकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

 

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना श्री. बबनराव वाळके यांनी महावितरणच्या सध्याच्या वीजपुरवठा वेळापत्रकावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, हा संपूर्ण परिसर बिबट प्रवण क्षेत्रात मोडत असून, या विभागातील अनेक गावांमध्ये बिबट्याचा वावर सातत्याने आढळून येत आहे. अशा परिस्थितीत अपरात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यास भाग पाडणे म्हणजे त्यांच्या जीविताला धोका निर्माण करण्यासारखे आहे.

 

“यापूर्वी रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये शेतकऱ्यांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करून रात्रीचा वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात यावा,” अशी ठाम भूमिका श्री. वाळके यांनी मांडली.

 

बिबट प्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शेतीपंपांना दिवसा सलग अथवा शेतकऱ्यांच्या सोयीच्या वेळेनुसार किमान आठ तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सध्याचे रात्रीचे वेळापत्रक तातडीने बदलून दिवसा वीजपुरवठ्यासाठी सुधारित वेळापत्रक लागू करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

 

शेतकऱ्यांच्या सुरक्षेबरोबरच शेतीपिकांचे संरक्षण आणि शेतीचे नियोजन या दृष्टीने दिवसा नियमित व पुरेसा वीजपुरवठा होणे अत्यंत आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. रात्रीच्या वेळेत शेतीमध्ये जाण्याची वेळ येत असल्याने शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासन आणि महावितरणने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

 

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. राजेंद्र जगदाळे पाटील, मार्केट कमिटीचे माजी संचालक श्री. राजेंद्र गायकवाड, लंघेवाडीचे माजी सरपंच श्री. संतोष लंघे, ग्रामपंचायत सदस्य श्री. कैलास आप्पा वाळके, तसेच श्री. गोरख बेंद्रे आणि श्री. राजेंद्र बेंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत दिवसा आठ तास वीजपुरवठा करण्याची मागणी जोरदारपणे मांडली.

 

आंदोलनानंतर महावितरण कंपनीच्या शिरूर येथील उपकार्यकारी अभियंता श्री. सुहास माने यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये बिबट प्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून रात्रीचा वीजपुरवठा बंद करावा आणि दिवसा किमान आठ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

 

सुधारित वेळापत्रक न झाल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा

 

यावेळी श्री. बबनराव वाळके यांनी प्रशासनाला इशाराही दिला. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी, बिबट प्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या जीविताच्या संरक्षणासाठी तसेच शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठी दिवसा वीजपुरवठ्याबाबत सुधारित वेळापत्रक तातडीने लागू करण्यात यावे, अशी त्यांनी मागणी केली.

 

दिवसा आठ तास वीजपुरवठा मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेत, मागणी मान्य न झाल्यास सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी न्हावरा फाटा येथे शेतकऱ्यांना सोबत घेऊन अहिल्यानगर–पुणे महामार्ग रोखण्याचा इशारा श्री. वाळके यांनी दिला.

 

या रास्ता रोको आंदोलनावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नितीन केनेकर, पोलीस कर्मचारी तसेच परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा आणि त्यांच्या हक्काच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न आता अधिक तीव्र बनला असून, महावितरण प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights