हवेली तालुका पाणंद रस्ते व आरोग्य व्यवस्थेचा गुरुवारी आढावा; लोणी काळभोर येथे दोन महत्त्वपूर्ण समित्यांची बैठक
प्रतिनिधी | हवेली – Rjnews27 मराठी
हवेली तालुक्यातील पाणंद, शिवरस्ते व शेतरस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांसह ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यासाठी हवेली तालुका पाणंद रस्ते समिती तसेच हवेली तालुका एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लोणी काळभोर येथे आयोजित करण्यात आली आहे. शिरूर-हवेलीचे आमदार तथा दोन्ही समित्यांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली कटके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
काही दिवसांपूर्वी थेऊर येथे आयोजित समाधान शिबिरात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर हवेली तालुक्यातील विविध पाणंद, शिवरस्ते व शेतरस्त्यांबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा बैठकीत सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.
रस्त्यांची सद्यस्थिती, आवश्यक कामांचे स्वरूप, अंदाजित खर्च, उपलब्ध निधी तसेच निधीची आवश्यकता याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कार्यवाही करण्याच्या दृष्टीने बैठकीत निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यासाठी महसूल विभाग, भूमीअभिलेख, वन विभाग, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, पंचायत समिती यांसह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जाणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी बारमाही व सुरक्षित रस्ते उपलब्ध व्हावेत, पावसाळ्यात वाहतुकीच्या अडचणी निर्माण होऊ नयेत आणि शेतमालाची वाहतूक सुलभ व्हावी, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत चर्चा होणार आहे.
दरम्यान, याच बैठकीत हवेली तालुका एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचाही आढावा घेतला जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC) व उपकेंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ, औषधसाठा आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांची स्थिती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात येणार आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मलेरिया, डेंग्यू तसेच इतर संसर्गजन्य व मौसमी आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, नियमित लसीकरण मोहीम आणि विविध राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी याबाबतही चर्चा होणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे, गरज असलेल्या गावांमध्ये विशेष आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर बैठकीत भर दिला जाणार आहे.
पाणंद रस्ते आणि आरोग्य व्यवस्था हे ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांतील समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रशासनातील विविध विभागांमध्ये समन्वय साधून ठोस कार्यवाही करण्याचा प्रयत्न बैठकीत केला जाणार आहे.
“शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्यांचा प्रश्न असो किंवा ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचा विषय असो, नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून ठोस कार्यवाही करण्यात येईल,” असे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.
लोणी काळभोर येथे होणाऱ्या या बैठकीत पाणंद रस्ते आणि आरोग्य व्यवस्थेबाबत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे हवेली तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ तसेच नागरिकांचे लक्ष लागले आहे.




