स्वप्नांना जिद्दीची जोड; पिंपरी दुमालाच्या शुभम खळदकरची एसआरपीएफमध्ये दमदार भरारी
शिरूर | प्रतिनिधी – विवेकानंद फंड
ग्रामीण भागातील युवकांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचा प्रत्यय पिंपरी दुमाला (ता. शिरूर) येथील शुभम शहाजी खळदकर याने आणून दिला आहे. राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) मध्ये त्याची निवड झाल्याने खळदकर कुटुंबासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शुभमचे वडील शहाजी खळदकर हे अपोलो टायर्स कंपनीत कार्यरत असून शेतीची जबाबदारीही ते समर्थपणे सांभाळतात. आदर्श शेतकरी आणि माजी चेअरमन म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. आई अर्चना खळदकर यांनी घरच्या परिस्थितीशी संघर्ष करत मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता भासू दिली नाही. आई-वडिलांच्या त्याग, कष्ट आणि संस्कारांच्या बळावर शुभमने हे यश मिळवले.
मुलांच्या शिक्षणासाठी खळदकर कुटुंबाने पिंपरी दुमालाहून वाघोली येथे वास्तव्यास जाण्याचा निर्णय घेतला. नोकरी, शेती आणि कुटुंब यांचा समतोल राखत दोन्ही मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी सातत्याने परिश्रम घेतले. शुभमची बहीण समृद्धी खळदकर सध्या बंगळुरू येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
शुभम हा राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा खेळाडू असून त्याने अनेक पदके मिळवली आहेत. खेळातून मिळालेली शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि कठोर सराव याचा त्याला एसआरपीएफ भरती प्रक्रियेत मोठा फायदा झाला. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.
शुभमचे यश हे केवळ खळदकर कुटुंबापुरते मर्यादित नसून ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. आर्थिक परिस्थितीपेक्षा जिद्द, मेहनत आणि पालकांची भक्कम साथ अधिक महत्त्वाची असते, हे त्याने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
एसआरपीएफमध्ये निवड झाल्याबद्दल शुभम खळदकर याच्यावर ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्याच्या उज्ज्वल सेवाकार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.




