शिरूर परिसरात तरुणावर सामूहिक मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 प्रतिनिधी- विजय कांबळे 

शिरूर तालुक्यातील वात्सल्य हॉस्पिटल समोर एका तरुणावर पाच जणांनी संगनमताने हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सतिषकुमार जयप्रकाश सिंग (वय 26, व्यवसाय – नोकरी), सध्या सुंदरसृष्टी, शिरूर येथे वास्तव्यास असून मूळ उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. दिनांक 17 जून 2026 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते आपल्या घरी जात असताना ही घटना घडली.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, शिक्रापूर येथील षषिकांत गायकवाड व त्याच्यासोबत असलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी त्यांना रस्त्यात अडवले. “तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले,” असा आरोप करत आरोपींनी संतापाच्या भरात फिर्यादीला शिवीगाळ केली आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.

यावेळी आरोपींनी फिर्यादीला गर्दीपासून दूर नेऊन आणखी मारहाण करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध विविध गुन्ह्यांखाली नोंद करण्यात आली आहे. सध्या आरोपींविरुद्ध तजवीज सुरू असून, पोलीस तपास यंत्रणा अधिक माहिती गोळा करत आहे.

घटनास्थळी कोणतेही हत्यार वापरण्यात आले नसल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणात कोणताही माल किंवा वाहन जप्त करण्यात आलेले नाही. आरोपींचा यापूर्वीचा गुन्हेगारी इतिहासही अद्याप समोर आलेला नाही.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदारांकडून सुरू असून, आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *