लाखनगाव पुलाजवळ गावठी हातभट्टी दारूवर कारवाई; संशयित आरोपी पसार

शिरूर पोलिसांनी चांडोह गावच्या हद्दीत लाखनगाव पुलाजवळ गावठी हातभट्टी दारूविरोधात कारवाई करत दहा लिटर तयार दारू जप्त केली. ही कारवाई शनिवारी (दि. १७ मे) सायंकाळी करण्यात आली असून संशयित आरोपी पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे चांडोह (ता. शिरूर) गावच्या हद्दीत लाखनगावच्या पुलाजवळील काटवन परिसरात एक व्यक्ती बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारू विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस अंमलदार श्रीधर जयसिंग जायभाय यांनी पथकासह परिसरात छापा टाकला.
या कारवाईदरम्यान देविदास उर्फ रामदास नानाभाऊ शिंदे (रा. चांडोह, ता. शिरूर, जि. पुणे) हा इसम दहा लिटर गावठी हातभट्टी दारूसह आढळून आला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच तो घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. घटनास्थळावरून सुमारे एक हजार रुपये किमतीची तयार गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार वारे करीत आहेत. प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *