शिरूर तालुक्यातील निर्वी-न्हावरे रोडवर बुधवारी सायंकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात मांडवगण फराटा येथील 29 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा अनिल बहिरट (वय 29, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) या दिनांक 13 मे रोजी सायंकाळी निर्वी गावच्या हद्दीत निर्वी-न्हावरे रोडवरून जात असताना वैभव सोनवणे यांच्या मक्याच्या कंपनीजवळ त्यांचा अपघात झाला. अपघातात त्या व त्यांची दुचाकी रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता.
घटनेची माहिती मिळताच गावातील तात्यासाहेब खंडेराव सोनवणे यांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, न्हावरे येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी राजेंद्र आबासाहेब बहिरट यांनी न्हावरे पोलीस चौकी येथे खबर दिली असून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये मयत रजिस्टर क्रमांक 74/2026 नुसार नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत असून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.




