“पेरू विक्रेत्याच्या मुलाची झेप: संकेत भालेराव यांची मुंबई पोलीस दलात निवड; जिद्द, कष्ट आणि स्वप्नांची यशोगाथा”

नागरगाव (प्रतिनिधी – विजय कांबळे):


सदल गाव येथील अत्यंत सामान्य आणि कष्टकरी कुटुंबातील युवक संकेत कचरू भालेराव यांची मुंबई पोलीस दलात निवड होऊन त्यांनी आपल्या कुटुंबाचे आणि गावाचे नाव उज्वल केले आहे. पेरू विक्रीचा छोटासा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे वडील महेंद्र कचरू भालेराव यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मुलाच्या शिक्षणासाठी अपार कष्ट घेतले.
आर्थिक अडचणी, मर्यादित साधनसामग्री आणि अनेक संकटांचा सामना करत संकेत यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले. आई उषा भालेराव यांचेही मुलाच्या यशामागे मोठे योगदान असून, त्यांनी प्रत्येक टप्प्यावर मुलाला प्रेरणा देत “आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल कर” असा विश्वास व्यक्त केला होता.
सुमारे पंचवीस वर्षांपासून सदलगावमध्ये वास्तव्य असलेल्या भालेराव कुटुंबाने आपल्या प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. संकेत यांच्या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, सर्वत्र त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
या यशाबद्दल सदलगाव ग्रामस्थांच्या वतीने संकेत भालेराव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच निवृत्ती जगताप, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष समाधान जगताप, पोलीस पाटील सुभाष पोळ तसेच सुभाष जगताप, सतीश जगताप, योगेश जगताप, प्रवीण जगताप, शेखर पवार, प्रमोद आश्वेध आदी मान्यवर उपस्थित होते.
संकेत भालेराव यांची ही यशोगाथा ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, “परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते,” याचा जिवंत आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *