आईकडून अकरा महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू; रांजणगाव परिसर हादरला
रमेश बनसोडे
शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात एका अकरा महिन्यांच्या चिमुकल्याच्या मृत्यूच्या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. कौटुंबिक व मानसिक तणावातून ही हृदयद्रावक घटना घडल्याचा प्राथमिक तपासातून उलगडा झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भांबर्डे येथील पवार वस्तीमध्ये राहणारे शेतकरी रविंद्र अशोक पवार (वय ३६) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यांच्या अकरा महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रथम पोलिसांकडे अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात धक्कादायक बाब समोर आली.
तपासादरम्यान कुटुंबातील सदस्यांकडून व संबंधितांकडून चौकशी करण्यात आली. त्यामध्ये घरातील परिस्थिती, कौटुंबिक तणाव आणि मानसिक अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची माहिती पुढे आली. प्राथमिक माहितीनुसार, चिमुकला मुलगा वारंवार रडत असल्यामुळे आणि वैयक्तिक आयुष्यातील तणावामुळे संतापाच्या भरात ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे.
घटना घडल्यानंतर पुरावा लपवण्याचा प्रयत्न झाल्याचीही माहिती तपासात पुढे आली. संबंधितांनी चिमुकल्याचा मृतदेह एका पिशवीत ठेवून जवळच्या शेतातील विहिरीत टाकल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. काही दिवसांनंतर ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून संबंधित महिलेला ताब्यात घेतले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे तसेच इतर अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी व फॉरेन्सिक तज्ज्ञांनीही तपासात सहकार्य केले.
या दुर्दैवी घटनेमुळे भांबर्डे गावासह संपूर्ण शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, निरागस चिमुकल्याच्या मृत्यूने नागरिकांचे मन सुन्न झाले आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून पुढील तपासानंतरच घटनेमागील संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.





