बाभुळसर बुद्रुक येथे सकल मराठा आरक्षण उपोषणास उत्स्फूर्त पाठिंबा….

बाभुळसर बुद्रुक येथे सकल मराठा आरक्षण उपोषणास उत्स्फूर्त पाठिंबा

RJNEWS27MARATHI प्रतिनिधी -अल्लाउद्दीन अलवी,

बाभुळसर बुद्रुक (ता. शिरुर) :
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून बाभुळसर बुद्रुक येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य फेरी काढण्यात आली. या फेरीत गावातील तरुण वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत मराठा समाजाच्या एकतेचा ठसा उमटवला.

फेरीदरम्यान “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही” अशा जोशपूर्ण घोषणा देण्यात आल्या. तरुणाईने मराठा समाजाला आरक्षण का आवश्यक आहे यावर भर देत, उच्च शिक्षण व नोकरीच्या संधींसाठी आरक्षण ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. आरक्षण मिळाल्यासच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतींचा व रोजगारातील संधींचा लाभ घेता येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, “सन्माननीय न्यायालय व राज्य सरकार यांनी तातडीने मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे” अशी मागणी एकमुखाने केली. तसेच संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या शांततामय आंदोलनाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा असल्याचेही यावेळी व्यक्त करण्यात आले.

विशेष म्हणजे, या फेरीत मराठा समाजाबरोबरच मुस्लिम बांधवांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत एकोपा व बंधुत्वाचा संदेश दिला. गावातील कार्यकर्त्यांनी सांगितले की, मुंबईला उपोषणासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी प्रत्येक घरातून “किमान दहा भाकरी व चटणी” पाठवण्याचे ठरवले आहे. आंदोलनाच्या काळात कार्यकर्त्यांना जेवणाची सोय व्हावी, या उद्देशाने गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला.

आयोजकांनी सर्व उपस्थित तरुणांचे, ग्रामस्थांचे आणि मुस्लिम बांधवांचे आभार मानले. तसेच हे आंदोलन शांततेच्या मार्गानेच पुढे नेण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *