फिल्मी स्टाईलने हिसकावलेले मंगळसूत्र पोलिसांच्या धाडसी कारवाईत परत!…

फिल्मी स्टाईलने हिसकावलेले मंगळसूत्र पोलिसांच्या धाडसी कारवाईत परत!

शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील घटना – आरोपी बीड जिल्ह्यात पकडले

प्रतिनिधी – RJNEWS27MARATHI.COM

शिरूर 
शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे घडलेल्या जबरी चोरीच्या प्रकरणात शिरूर पोलिसांनी केवळ अल्पावधीत आरोपींना गजाआड केले नाही, तर चोरट्यांकडून दिड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करून ते संबंधित महिलेस परत दिले आहे. या कारवाईमुळे नागरिकांत पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे.
घटनेचा तपशील
जून २०२५ रोजी दुपारी वडगाव रासाई येथील शांभवी किराणा दुकानात फिर्यादी सुरेखा अनिल कुंभार (वय ४६) काम करत असताना दोन अज्ञात इसमांनी फिल्मी पद्धतीने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले.
यातील एकाने दुकानात ग्राहक असल्याचे भासवत पाण्याची बाटली मागितली. पैसे परत करताना संधी साधून त्याने फिर्यादींच्या गळ्यातील १ तोळा ८ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण (किंमत सुमारे १.५ लाख रुपये) हिसकावले. बाहेर त्याचा साथीदार विनानंबर दुचाकीवर थांबलेला होता. दोघेही क्षणार्धात पसार झाले.

फिर्यादी महिलेच्या मुलाने पाठलागाचा प्रयत्न केला; मात्र चोरटे फरार झाले.
पोलिसांची शिताफी
घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते, अंमलदार पवन तायडे तसेच रांजणगाव पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. काटेकोर गुप्त माहितीच्या आधारे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात छापा टाकून आरोपी

मारुती उर्फ गोविंद रामनाथ आंधळे (वय ३८, रा. निंबाळी, ता. आष्टी, जि. बीड)

शरद बापु पवार (रा. लोणी सयदमिर, ता. आष्टी, जि. बीड)
यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले.
महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू
न्यायालयाच्या आदेशानुसार दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी फिर्यादी सुरेखा अनिल कुंभार यांना पोलिसांनी त्यांचे दागिने परत दिले. आयुष्यातील अमूल्य दागिना परत मिळाल्याने महिलेच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. यशस्वी कारवाईमागे…
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते, पोलीस हवालदार बापु मांगडे व पोलीस अंमलदार पवन तायडे यांनी मोलाची भूमिका बजावली.
शिरूर पोलिसांच्या धाडसी व तत्पर कारवाईमुळे नागरिकांत सुरक्षिततेची भावना दृढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *