जयभीम पँथर – एक संघर्ष : बाबासाहेबांच्या विचारांची क्रांती चित्रपटाच्या माध्यमातून
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, ११ एप्रिल रोजी ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ हा बहुचर्चित आणि आशयघन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भदंत शीलबोधी थेरो यांच्या नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनद्वारे निर्मित आणि आयु. रामभाऊ तायडे यांच्या सहनिर्मितीत तयार झालेला हा चित्रपट सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची गाथा मांडणारा ठरणार आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित नवभारताच्या निर्मितीसाठी एक ठोस पाऊल उचलण्यात आले आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी निशांत नाथाराम धापसे यांनी समर्थपणे पार पाडली असून, प्रोजेक्ट हेड म्हणून संतोष गाडे, कार्यकारी निर्माता बाबासाहेब पाटील, तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी प्रकाश सिंगारे यांनी सांभाळली आहे.
तगडी स्टारकास्ट आणि आशयघन कथानक
‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ या चित्रपटात गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, मिलिंद शिंदे, अभिजीत चव्हाण, सोनाली पाटील, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, संजय कुलकर्णी, प्रवीण डाळिंबकर, विनय धाकडे, प्रियांका उबाळे यांसारख्या गुणी कलाकारांचा सहभाग आहे. या सर्व कलाकारांनी सामाजिक वास्तवाचे भावनिक आणि प्रेरणादायी चित्रण प्रेक्षकांसमोर मांडले आहे.
संगीत आणि गीतांनी निर्माण केलेली क्रांतीची भावना
चित्रपटातील “माझ्या भीमाची जयंती” हे गाणं सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या आवाजात असून, सध्या ते समाजमाध्यमांवर विशेष गाजत आहे. रोहित नागभिडे यांनी संगीत दिले असून, पार्श्वसंगीतदेखील त्यांनीच दिले आहे. गीताचे लेखन दिग्दर्शक निशांत धापसे यांनी केले आहे.
क्रांती, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तन
हा चित्रपट दलित, शोषित आणि बहुजन समाजाच्या संघर्षावर प्रकाश टाकतो. जातीव्यवस्थेतील अन्याय, राजकीय व सामाजिक चळवळी, बहुजनांचे आत्मसन्मानासाठीचे आंदोलन यांचे वास्तवदर्शी चित्रण ‘जयभीम पँथर’ चित्रपटात पाहायला मिळेल. केवळ घटनांच्या मांडणीत न अडकता, विचारांची क्रांती उभी करण्याचा प्रयत्न या सिनेमातून दिसून येतो.
प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दमदार लेखन, अनुभवी कलाकारांचा अभिनय आणि प्रभावी दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट निश्चितच लोकांच्या मनावर खोलवर परिणाम करणार आहे.
११ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘जयभीम पँथर – एक संघर्ष‘ या चित्रपटाकडे सामाजिक जाणीवा असलेले प्रेक्षक आता मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. बाबासाहेबांच्या विचारांना समर्पित आणि त्यांच्या लढ्याच्या तेजस्वी उजेडात चालणारा हा सिनेमा एक ऐतिहासिक ठसा उमटवेल, यात शंका नाही.




