मालाडमध्ये विद्यार्थ्यांसाठी सायबर जागरूकता सत्र; ‘माझा डेटा, माझी जबाबदारी’चा संदेश

मालाडमध्ये विद्यार्थ्यांसाठी सायबर जागरूकता सत्र; ‘माझा डेटा, माझी जबाबदारी’चा संदेश

Rjnews27marathi- रमेश बनसोडे 

मालाड, मुंबई, दि. १२ ऑगस्ट २०२६ : डिजिटल युगात वाढत्या सायबर धोक्यांच्या पार्श्वभूमीवर तरुणांमध्ये सायबर सुरक्षा आणि डिजिटल जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने क्विक हील फाऊंडेशन, बी. एस. जी. डीएस कॉलेज आणि पाटकर-वर्दे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बी. एस. जी. डीएस कॉलेजमध्ये संवादपर सायबर सुरक्षा जागरूकता सत्राचे आयोजन करण्यात आले. क्विक हील फाऊंडेशनच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल व्यवहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

 

यंदाच्या उपक्रमाची प्रमुख संकल्पना ‘माझा डेटा, माझी जबाबदारी’ अशी असून, वैयक्तिक माहिती, डिजिटल ठसे आणि ऑनलाइन खात्यांची सुरक्षितता याबाबत प्रत्येकाने स्वतःहून काळजी घेण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. सोशल मीडिया, ऑनलाइन व्यवहार आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्मचा वाढता वापर लक्षात घेता सायबर फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

 

 

या सत्राचे विशेष आकर्षण म्हणजे पाटकर-वर्दे महाविद्यालयातील प्रशिक्षित विद्यार्थी सायबर वॉरियर्स तुषार शेट्टी आणि सुदर्शन यादव यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थी व शिक्षकांना दैनंदिन डिजिटल वापरामध्ये येऊ शकणाऱ्या विविध सायबर धोक्यांची उदाहरणे देऊन त्यापासून बचाव करण्याचे मार्ग समजावून सांगण्यात आले.

 

यावेळी डेटा संरक्षण व गोपनीयता, ऑनलाइन फसवणूक ओळखणे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि सायबर गुन्ह्यांची तक्रार कशी नोंदवावी, या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, संशयास्पद संदेशांना प्रतिसाद न देणे, वैयक्तिक माहिती कोणासोबतही सहज शेअर न करणे आणि डिजिटल खात्यांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने पाहणे, याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.

 

बी. एस. जी. डीएस कॉलेजच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाचे स्वागत करताना आजच्या तंत्रज्ञानस्नेही पिढीसाठी केवळ डिजिटल साधनांचा वापर करण्याचे ज्ञान पुरेसे नसून, त्यांचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्याची जाणीव असणे तितकेच आवश्यक असल्याचे नमूद केले. पाटकर-वर्दे महाविद्यालयातील विद्यार्थी सायबर वॉरियर्स आणि क्विक हील फाऊंडेशनने महाविद्यालयाच्या परिसरात सायबर जागरूकता उपक्रम राबवल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.

 

‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून क्विक हील फाऊंडेशन आणि पाटकर-वर्दे महाविद्यालयाकडून तरुणांमध्ये सायबर सुरक्षेची जाणीव निर्माण करण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. डिजिटल जगात वाढत्या धोक्यांना सामोरे जाताना प्रत्येकाने स्वतःच्या माहितीची जबाबदारी स्वीकारावी आणि सुरक्षित डिजिटल नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

 

‘माझा डेटा, माझी जबाबदारी’ या संदेशातून विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल भविष्यासाठी सज्ज करण्याचा प्रयत्न या सायबर जागरूकता उपक्रमातून करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *