वरवंडमध्ये शेतरस्त्यावर अडथळे निर्माण करून शेतकऱ्याला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; पाच जणांविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा

वरवंडमध्ये शेतरस्त्यावर अडथळे निर्माण करून शेतकऱ्याला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; पाच जणांविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा

प्रतिनिधी – विकास साळुंके 

वरवंड, ता. दौंड, जि. पुणे : ऊस वाहतुकीसाठी सार्वजनिक रस्त्यावरून ट्रॅक्टर घेऊन जात असताना रस्त्यावर विविध प्रकारचे अडथळे निर्माण करून शेतकऱ्याचा रस्ता अडविणे, अश्लिल भाषेत शिवीगाळ करणे, दमदाटी करणे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वरवंड येथील पाच जणांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सौ. किरण सागर फरगडे (वय २९ वर्षे, व्यवसाय शेती, रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वरवंड गावच्या हद्दीतील शेतजमीन गट क्रमांक १५६१ परिसरात ही घटना घडली.

 

फिर्यादी या आपल्या शेतातील उसाची वाहतूक करण्यासाठी सार्वजनिक रस्त्यावरून ट्रॅक्टर घेऊन जात असताना आरोपींनी रस्त्यावर मुरूम टाकून, सिमेंटचे पाईप आडवे ठेवून तसेच मोठमोठे दगड टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. याशिवाय रस्त्यावर पाणी सोडणे आणि बांध कोरून रस्ता अडविण्याचा प्रकार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

रस्ता अडविल्यानंतर आरोपींनी फिर्यादीस अश्लिल भाषेत शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे शेतातील ऊस वाहतुकीचा मार्ग अडविण्यात आल्याने शेतकऱ्याला अडचणींचा सामना करावा लागल्याचे सांगण्यात आले आहे.

 

या प्रकरणी संतोष राजाराम फरगडे, भाउसाहेब राजाराम फरगडे, राजाराम सिताराम फरगडे, निर्मला संतोष फरगडे आणि सोनाली भाउसाहेब फरगडे (सर्व रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे) यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या घटनेची नोंद २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार क्रमांक ९९३ करे यांनी केली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार फणसे करीत आहेत.

 

शेतरस्त्यावर अडथळे निर्माण करून वाद निर्माण झाल्याने या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *