शिरूर परिसरात एम.डी. अंमली पदार्थाची तस्करी उघड; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांची संयुक्त कारवाई; ११० ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थ हस्तगत
विजय कांबळे – प्रतिनिधी
नागरगाव : नशामुक्त भारत अभियान आणि ‘ड्रग्स फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. याच मोहिमेंतर्गत शिरूर परिसरात स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत ११० ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित एम.डी. अंमली पदार्थ तसेच मोटारसायकल असा एकूण सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात अंमली पदार्थ तसेच तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री, साठवणूक आणि सेवन रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी अवैध व्यवसायांविरोधात प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची विविध पथके तयार करून अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर लक्ष ठेवण्यात येत होते.
दरम्यान, १८ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात अवैध व्यवसायांविरोधात कारवाईच्या अनुषंगाने गस्त घालत असताना शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची बेकायदेशीर देवाणघेवाण होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी पथकाला दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार तुषार पंधारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सुरेंदसिंह भैरुसिंह राठोड उर्फ राजपुत, वय २४ वर्षे, सध्या रा. मनिष शिरोळे फार्म हाऊस, मलठण, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. गोगादेव की ढाणी, बांकियावास खुर्द, ता. कल्याणपूर, जि. बाडमेर, राजस्थान आणि श्रवण तेजाराम बिष्णोई, वय ३१ वर्षे, रा. मनिष शिरोळे फार्म हाऊस, मलठण, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. बांकियावास खुर्द, ता. कल्याणपूर, जि. बाडमेर, राजस्थान हे दोघे मलठण गावच्या हद्दीतील राजवाडा चौक येथे प्रतिबंधित एम.डी. अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर उपविभाग यांचे आदेश प्राप्त केले. त्यानंतर पंचांसह स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीस ठाण्याचे पथक छापा कारवाईसाठी रवाना झाले. १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे १२ वाजून १० मिनिटांनी पथकाने राजवाडा चौक परिसरात छापा टाकला.
या कारवाईदरम्यान वरील दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ११० ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित एम.डी. अंमली पदार्थ आणि मोटारसायकल असा एकूण सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७४४/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क) व २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराविरोधात शिरूर परिसरात झालेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या एम.डी. अंमली पदार्थाचा स्रोत, तो कोणाकडून आणण्यात आला, त्याची विक्री कोणाला केली जाणार होती तसेच या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, शिरूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केनेकर, पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.
सदर प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याकडून सुरू असून, अंमली पदार्थांच्या या व्यवहारामागील संपूर्ण साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची दिशा निश्चित करण्यात आली आहे.




