खंडाळे जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, ‘मॉडेल स्कूल’ म्हणून निवड
प्रतिनिधी : शिरूर- Rjnews27marathi
खंडाळे : खंडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत खंडाळे शाळेची ‘मॉडेल स्कूल’ म्हणून निवड झाल्याची माहिती मुख्याध्यापक सुदाम लंघे यांनी दिली. या योजनेंतर्गत शाळेत सुमारे दोन कोटी रुपयांची विकासकामे होणार असल्याने शाळेच्या भौतिक व शैक्षणिक सुविधांना मोठी चालना मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सारिकाताई दरवडे होत्या. मेजर विकास नरवडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महिला पदाधिकारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या मातांना व्यासपीठावर विशेष स्थान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. शाळेत विद्यार्थ्यांची भाषणे, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, सामूहिक कवायत आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांना उपस्थित पालक, ग्रामस्थ व मान्यवरांनी उत्स्फूर्त दाद दिली.
शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीराज किशोर नरवडे याने २७८ गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादीत दहावे स्थान पटकावले. तसेच आराध्य अशोक ढोबळे याने २७२ गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळविला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
याशिवाय विराज नरवडे, सार्थक नरवडे, प्रणिती दरवडे, काव्या दरवडे, गायत्री गव्हाणे आणि मंदार नरवडे यांचाही गुणवंत विद्यार्थी म्हणून गौरव करण्यात आला. मंथन, अभिरूप तसेच एनएसएसई परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, ट्रॉफी तसेच रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे सुजाता चव्हाण मॅडम, मुख्याध्यापक सुदाम लंघे यांच्यासह शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
दानशूर व्यक्तींचाही सन्मान
शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी विविध प्रकारे योगदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींचाही यावेळी सन्मान करण्यात आला. शाळेच्या प्रगतीसाठी ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी व दानशूर व्यक्तींचे मिळणारे सहकार्य कौतुकास्पद असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमास आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले. सूत्रसंचालन रमेशबापू नरवडे यांनी केले, तर विश्वंभर नरवडे यांनी आभार मानले.
‘मॉडेल स्कूल’ म्हणून झालेली निवड आणि विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेले यश यामुळे खंडाळे जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा मिळाली असून, आगामी काळात शाळेचा सर्वांगीण विकास होण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.




