रांजणगाव गणपती येथे ५१ गरोदर मातांचा सन्मान; आरोग्य मार्गदर्शनासह पौष्टिक आहार व आवश्यक साहित्याचे वाटप

रांजणगाव गणपती : Rjnews27 मराठी 

आयुष्यमान आरोग्य मंदिर, रांजणगाव गणपती येथे गरोदर मातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासोबतच त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ५१ गरोदर मातांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद सदस्या तथा जन आरोग्य समितीच्या अध्यक्षा सौ. स्वातीदत्ताशेठ पाचुंदकर यांच्या संकल्पनेतून मंगळवार, दि. १८ ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील एकूण ९५ गरोदर मातांची नोंदणी करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी ५१ गरोदर मातांचा पारंपरिक पद्धतीने ओटी भरण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गरोदर मातांना साडी, पौष्टिक आहार तसेच आवश्यक औषधोपचार साहित्य देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची प्रस्तावना व उपस्थितांचे स्वागत वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी केले. यावेळी त्यांनी गरोदर मातांना गर्भावस्थेतील आरोग्याची काळजी, नियमित वैद्यकीय तपासणी, सकस व संतुलित आहार, वेळेवर औषधोपचार तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले.

गरोदर मातांसाठी दर मंगळवारी मोफत तपासणी

आयुष्यमान आरोग्य मंदिर, रांजणगाव गणपती येथे दर मंगळवारी गरोदर मातांची नियमित आरोग्य तपासणी व आवश्यक औषधोपचार मोफत करण्यात येतात. या आरोग्य सुविधेचा परिसरातील गरोदर मातांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास ग्रामपंचायत रांजणगाव गणपतीच्या विद्यमान सरपंच सौ. सुवर्णाताई वायदंडे, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शेलार, सविता धारिवाल यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. त्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करण्यात आले.

गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्यांना सामाजिक सन्मान देणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. ओटी भरण्याचा कार्यक्रम सुंदर व नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित केल्याबद्दल उपस्थित गरोदर मातांनी सौ. स्वाती पाचुंदकर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *