नागपंचमीनिमित्त तांदळीत महिलांसाठी विविध कार्यक्रमांचा उत्साह
तांदळी (माळवाडी) : प्रतिनिधी- राम कांबळे
नागपंचमीच्या सणाचे औचित्य साधून तांदळी (माळवाडी) येथे देवराई ग्राम विकास फाउंडेशनच्या वतीने महिला भगिनींसाठी विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वृक्षमित्र वामन तात्या कळसकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला महिलांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. आनंदी व उत्साही वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे महिला भगिनींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या महिलांचा देवराई ग्राम विकास फाउंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ तसेच गुलाबाचे रोप भेट देऊन गौरव करण्यात आला.
संगीत खुर्चीच्या कार्यक्रमानंतर महिलांनी पारंपरिक पद्धतीने फेर धरत फुगडीचा आनंद लुटला. यामध्ये लहान मुलींनीही उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. महिलांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम सुरू असतानाच युवा वर्गासाठी कबड्डी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. युवकांनी मोठ्या उत्साहाने कबड्डी खेळात सहभाग घेतला. त्यामुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांची सुंदर जोड मिळाली.
या कार्यक्रमास तांदळी गावच्या सरपंच रेखाताई गणेश गदादे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, आम्ही मावळे शिव दुर्ग वेडे संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच मोठ्या संख्येने युवा वर्ग उपस्थित होता. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम उत्साहात आणि सुरळीतपणे पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शेलार सर यांनी केले, तर महेंद्र गदादे यांनी उपस्थितांचे आभार मानले. नागपंचमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून महिलांना आनंदाचे व्यासपीठ मिळण्याबरोबरच वृक्षसंवर्धनाचा संदेशही देण्यात आला. गुलाबाची रोपे भेट देत पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा फाउंडेशनचा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.




