प्रतिनिधी : विवेकानंद फंड
शिरूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘दीनमित्रमधील सामाजिक अग्रलेखांचा अभ्यास’ या विषयावरील प्रबंधासाठी डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल रायकुमार गुजर प्रशालेतील शिक्षिका डॉ. रूपाली ढमढरे यांचा बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात सन्मान करण्यात आला. साहित्य, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत त्यांनी मिळवलेले हे यश परिसरातील विद्यार्थ्यांसह शिक्षक व साहित्यप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
यावेळी डॉ. रूपाली ढमढरे यांचा पुस्तक, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास बालकुमार साहित्य संस्थेचे संस्थापक तथा कवी मनोहर परदेशी, संस्थेचे अध्यक्ष राहुल चातुर, सचिव संजीव मांढरे, प्रमुख कार्यवाह विवेकानंद फंड, उद्योजक अनिल ढमढरे, तळेगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विजय काका ढमढेरे तसेच हर्षदा परदेशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. रूपाली ढमढरे यांनी आपल्या संशोधन प्रवासाविषयी मनोगत व्यक्त केले. ‘दीनमित्र’ या विषयावर गेल्या चार वर्षांपासून सातत्याने अभ्यास, संशोधन आणि संदर्भांचे संकलन करून प्रबंध तयार केल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रबंध पूर्ण करताना कुटुंबीयांची मोलाची साथ लाभल्याचे नमूद करत त्यांनी आपल्या यशामागे कुटुंबीयांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. तसेच, मिळवलेल्या ज्ञानाचा आणि संशोधनातून प्राप्त झालेल्या अनुभवाचा भविष्यात शैक्षणिक क्षेत्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना उपयोग करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
बालकुमार साहित्य संस्थेचे संस्थापक कवी मनोहर परदेशी यांनी डॉ. ढमढरे यांच्या यशाचे कौतुक करताना, नोकरीची जबाबदारी पार पाडत असताना संसार आणि कुटुंब सांभाळून पीएच.डी.सारखी उच्च शैक्षणिक पदवी संपादन करणे ही निश्चितच अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब असल्याचे सांगितले. त्यांच्या या जिद्दीचा आणि मेहनतीचा आदर्श इतरांनीही घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.
संस्थेचे अध्यक्ष राहुल चातुर यांनी सांगितले की, आपल्या परिसरातील एका शिक्षिकेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या नामांकित शिक्षण संस्थेतून डॉक्टरेट पदवी मिळवणे ही संपूर्ण शिरूर तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना आणि तरुणांना उच्च शिक्षण व संशोधनाची प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
माजी प्राचार्य संजीव मांढरे यांनी डॉ. रूपाली ढमढरे या सुरुवातीपासूनच मेहनती, कष्टाळू आणि ध्येयवेड्या असल्याचे सांगत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक केले. तर शिरूर तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विवेकानंद फंड यांनी शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याचे सांगत, जिद्द, सातत्य आणि मेहनत असेल तर कोणतेही ध्येय गाठणे शक्य असल्याचे मत व्यक्त केले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ. रूपाली ढमढरे यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी उद्योजक अनिल ढमढरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
डॉ. रूपाली ढमढरे यांनी संपादन केलेली डॉक्टरेट ही केवळ वैयक्तिक शैक्षणिक यशाची नोंद नसून, नोकरी, कुटुंब आणि संशोधन या तिन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत ज्ञानसाधना करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून या यशाकडे पाहिले जात आहे.




