हायवा टिप्पर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी गजाआड

वडगाव निंबाळकर, प्रतिनिधी : शिरूर विजय कांबळे 

वडगाव निंबाळकर पोलिसांनी हायवा टिप्पर चोरी प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ८ लाख रुपये किमतीचा चोरीचा हायवा टिप्पर हस्तगत करण्यात आला असून, पोलिसांच्या तातडीच्या आणि तांत्रिक तपासामुळे चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै २०२६ रोजी रात्री ८ ते २३ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान बारामती तालुक्यातील मुढाळे परिसरातून हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या पंपावरून हायवा टिप्पर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जलद तपास करत संभाजीनगर येथून चोरीचा हायवा टिप्पर आणि दोन संशयितांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल विठ्ठल कराळे (वय ३२, रा. सिरसगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर) आणि आदित्य रमेश कराळे (वय २५, रा. सिरसगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर) यांचा समावेश आहे. चौकशीत त्यांनी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार भागवत पाटील करीत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैत्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार भागवत पाटील, महेश पळसे, पोपट नाळे, अनिल खेडकर, हृदयनाथ देवकर तसेच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

वडगाव निंबाळकर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांवर मोठा आळा बसण्यास मदत होणार असून, परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *