पाटसमध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे भक्तीमय स्वागत; व्यापारी संस्थेकडून १५० बिस्किट बॉक्स, २०० पाणी बॉक्सचे वाटप

प्रतिनिधी – योगेश राऊत 

 

पाटस, दि. १४ जुलै : जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी (दि. १४) उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पाटसमध्ये दाखल झाला. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड गजराने आणि टाळ-मृदुंगाच्या निनादाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाटस व्यापारी संस्थेने दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट नियोजन करत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बिस्किटे व पिण्याच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर वाटप केले.

सकाळपासूनच वारकरी भाविकांचा ओघ पाटसकडे सुरू झाला होता. हजारो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पाटस व्यापारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह व्यापारी बंधूंनी स्वतः उपस्थित राहून सेवाकार्यात सहभाग घेतला. वारकरी बांधवांना आदराने बिस्किटे व पिण्याचे पाणी देत त्यांच्या सेवेला प्राधान्य देण्यात आले.

 

यावेळी व्यापारी बंधूंच्या सहकार्याने तब्बल १५० बिस्किट बॉक्स आणि २०० पाणी बॉक्स यांचे वाटप करण्यात आले. संपूर्ण नियोजन शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडल्याने वारकरी बांधवांनीही या सेवाभावाचे कौतुक केले.

 

पाटस व्यापारी संस्था ही दरवर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात व्यापारी बांधवांचा सक्रिय सहभाग राहावा आणि वारकरी सेवेचे पुण्य लाभावे या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. यंदाही सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सेवाकार्यात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपली.

याशिवाय पाटस ग्रामविकास फाउंडेशन आणि सत्कर्म फाउंडेशन या सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांनीही या सेवाकार्यात सक्रिय सहभाग नोंदवत वारकरी बांधवांची सेवा केली.

 

दरम्यान, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दि. १३ जुलै रोजी पाटस व्यापारी संस्था आणि गरदडे कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने महाप्रसाद व पिण्याच्या पाण्याचेही आयोजन करण्यात आले होते. सुमारे १,००० वारकरी बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात व्यापारी समाजाचाही सेवाभावाने सहभाग राहावा, अधिकाधिक वारकरी बांधवांपर्यंत सेवा पोहोचावी आणि भविष्यात आणखी व्यापक स्वरूपात सेवा उपक्रम राबवावेत, असा मानस यावेळी पाटस व्यापारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडवून आणत पाटस व्यापारी संस्थेने यंदाही वारकरी सेवेची समृद्ध परंपरा कायम राखल्याचे चित्र पाटसमध्ये पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *