प्रतिनिधी – अल्लाउद्दीन अलवी
बाभुळसर बुद्रुक, ता. १३ : शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील मांडवगण फराटा पंचायत समिती गणातील बाभुळसर बुद्रुक गावाच्या विविध विकासकामांसाठी शिरूर-हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्या माध्यमातून सुमारे ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे धार्मिक, सामाजिक आणि सार्वजनिक सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मंजूर झालेल्या निधीतून लक्ष्मी माता मंदिर सभामंडपासाठी १० लाख रुपये, बाभुळसर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरण व सुधारणा कामासाठी १० लाख रुपये, उदनशा बाबा देवाचे माळ येथे ओपन जिम साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ५ लाख रुपये, तसेच गावठाण परिसरात ओपन जिम साहित्य उभारण्यासाठी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय अन्य आवश्यक विकासकामांसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
हा निधी मंजूर होण्यासाठी सरपंच दिपालीताई नागवडे तसेच महेंद्र हनुमंत नागवडे (उपाध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक) यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना आमदार माऊली कटके यांनी सकारात्मक प्रतिसाद देत गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सरपंच दिपालीताई नागवडे यांनी सांगितले की, “या निधीमुळे बाभुळसर बुद्रुकमधील धार्मिक स्थळे, सार्वजनिक चौक आणि नागरिकांसाठी आरोग्यदायी सुविधा उभारण्यास मदत होणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील.”
गावातील विविध विकासकामांना गती मिळाल्याने ग्रामस्थांनी आमदार माऊली कटके, सरपंच दिपालीताई नागवडे आणि महेंद्र नागवडे यांचे आभार व्यक्त केले असून, ही कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.




