पारगाव बाजारपेठेतील पाणी तुंबण्याच्या समस्येला दिलासा; दूरदृष्टीतून ड्रेनेज लाईनच्या कामास गती
पारगाव सोसायटी ते पारगाव फाटा दरम्यान ड्रेनेज लाईनचे काम प्रगतीपथावर; सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सर्वानुमते विकासकामाला वेग
प्रतिनिधी – विजय कांबळे
नागरगाव – ता. दौंड येथील पारगाव बाजारपेठेचा झपाट्याने विस्तार होत असून वाढत्या लोकवस्तीमुळे आणि पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या समस्येमुळे नागरिक, व्यापारी वर्ग तसेच वाहनचालकांना अनेक वर्षांपासून मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरपंच सुभाष तात्या बोत्रे, ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच संभाजी सयाजीराव ताकवणे तसेच ग्रामस्थ यांच्या सर्वानुमते पारगाव सोसायटी ते पारगाव फाटा या दरम्यान ड्रेनेज लाईनचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आले असून ते सध्या प्रगतीपथावर आहे.
या कामामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होणार असून बाजारपेठेतील घरांमधील व व्यावसायिक आस्थापनांमधील सांडपाण्याचीही प्रभावी व्यवस्था होणार आहे. परिणामी परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी होण्यास मदत मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. भविष्यातील वाढती लोकवस्ती, बाजारपेठेचा विस्तार आणि आवश्यक नागरी सुविधा लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने दूरदृष्टी ठेवत हे नियोजन केले आहे.
सदर कामाची वेळोवेळी पाहणी माजी उपसरपंच संभाजी सयाजीराव ताकवणे हे करत असून त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ (बबलू) सुभाष ताकवणे हे देखील उपस्थित राहून कामाचा आढावा घेत आहेत. काम दर्जेदार व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावे यासाठी संबंधितांकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
या विकासकामास सरपंच सुभाष तात्या बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी सर्वानुमते मान्यता दिली असून काम सध्या वेगाने प्रगतीपथावर सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर बाजारपेठेतील पाणी तुंबण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होऊन नागरिक व व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.




