कळमेश्वर (प्रतिनिधी):अनिकेत उमरेडकर
कळमेश्वर तालुक्यातील केतापार शिवप्रिया परिसरात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या नीलगायीची वनविभाग, पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या समन्वयातून यशस्वी सुटका करण्यात आली. जखमी वन्यप्राण्याला तातडीने उपचारासाठी नागपूर येथील रेस्क्यू सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याने त्याचा जीव वाचविण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील नागरिकांना एक नीलगाय जखमी अवस्थेत दिसून आली. याबाबत माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज जी. काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रशांत खोब्रागडे, पोलीस कर्मचारी नुमान शेख व गिरीश मोहड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
यावेळी सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे, विकास बागडे, मिलिंद नानावरे आणि अमोल गाठीबांधे यांनीही मदतकार्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत वन्यप्राण्याच्या सुरक्षित बचावासाठी सहकार्य केले.
यानंतर कळमेश्वर वनविभागाचे आरएफओ प्रवीण साठवणे यांच्या मार्गदर्शनाखाली के. एस. वाटकर (क्षेत्र सहाय्यक), मंगेश बोपटे (वनरक्षक), दिनेश पडवळ (वनरक्षक), राकेश बावणे (वाहनचालक) आणि संदीप ठाकरे (मजूर) यांच्या पथकाने आवश्यक दक्षता घेत जखमी नीलगायीची सुरक्षित सुटका केली.
बचाव मोहिमेनंतर नीलगायीला पुढील उपचारासाठी नागपूर येथील सेमिनरी हिल रेस्क्यू सेंटर येथे दाखल करण्यात आले. वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात असून, प्रशासन आणि सामाजिक घटकांच्या समन्वयातून वन्यप्राण्यांचे संरक्षण प्रभावीपणे करता येते, याचे हे उदाहरण ठरले आहे.
या यशस्वी बचाव मोहिमेबद्दल परिसरातील नागरिकांनी वनविभाग, पोलीस प्रशासन आणि मदतकार्य करणाऱ्या सर्वांचे कौतुक करत त्यांच्या तत्परतेचे स्वागत केले.




