शिरूर, प्रतिनिधी : Rjnews 27मराठी
शिरूर तालुक्यातील निमोणे येथील दुर्गे वस्ती परिसरात गाय सोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, किरण उत्तम बहिरट (वय 20, रा. दुर्गे वस्ती, निमोणे, ता. शिरूर) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, 20 जून 2026 रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोर आरोपी तुषार एकनाथ दुर्गे व भरत एकनाथ दुर्गे (दोघेही रा. दुर्गे वस्ती, निमोणे) आले. “तू माझी गाय का सोडली?” या कारणावरून दोघांनी वाद घालत शिवीगाळ व दमदाटी केली.
वादाचे रूपांतर पुढे मारहाणीत झाले. यावेळी एका आरोपीने जवळ पडलेल्या बांबूने तर दुसऱ्याने उसाच्या कांड्याने फिर्यादीच्या पाठीवर, पायावर व डोक्यावर मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या मारहाणीत फिर्यादीला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच, आरोपींपैकी एकाने मोबाईलद्वारे संदेश पाठवून “तुझे तुकडे तुकडे करीन” अशी धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस हवालदार गर्कळ यांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.




