यवत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवैध गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह तरुण जेरबंद

यवत, ता. दौंड (प्रतिनिधी):विकास साळुंके 

पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्ती व अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत यवत पोलिसांनी मोठी कारवाई करत एका २१ वर्षीय तरुणाला गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध शस्त्रधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास भुलेश्वर फाटा ते भुलेश्वर मंदिर मार्गावर एक तरुण विनापरवाना गावठी पिस्टल बाळगत असल्याची गोपनीय माहिती यवत पोलिसांना प्राप्त झाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयित व्यक्तीची तपासणी केली. त्यावेळी आदित्य सर्जेराव सांगळे (वय २१, रा. दत्तनगर, पाटस, ता. दौंड, जि. पुणे) याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतुस आढळून आले.

विशेष म्हणजे, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १३ जून ते २६ जून २०२६ या कालावधीत पुणे ग्रामीण जिल्ह्यात शस्त्रे, तलवारी, बंदुका तसेच इजा पोहोचविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू बाळगण्यास मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. असे असतानाही आरोपीने अवैधरीत्या शस्त्र बाळगून या आदेशाचे उल्लंघन केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी आरोपीकडून जप्त करण्यात आलेले गावठी पिस्टल व जिवंत काडतुस ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीविरुद्ध यापूर्वीही शरीराविरुद्धच्या स्वरूपाचा गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची अधिक सखोल चौकशी सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड करीत आहेत. आरोपीकडे शस्त्र कुठून आले, ते कोणाकडून विकत घेतले किंवा अन्य कोणत्या गुन्हेगारी कृत्यासाठी वापरण्याचा त्याचा उद्देश होता का, याबाबत तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, संदीप देवकर, गणेश कर्चे, महेंद्र चांदणे तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

यवत पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भविष्यातही अशाच कठोर आणि धडाकेबाज कारवाया सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती तत्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *