दौंडमध्ये ज्येष्ठ नागरिकाला आर्थिक व मानसिक छळ; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा

दौंडमध्ये ज्येष्ठ नागरिकाला आर्थिक व मानसिक छळ; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा

पाटस प्रतिनिधी- योगेश राऊत

दौंड शहरातील महादेव गल्ली परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाला आर्थिक फसवणूक करून मानसिक त्रास दिल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी १३ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, फसवणूक व धमकीसंदर्भातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अव्दैत विवेक गटणे (वय ३७, व्यवसाय – खाजगी नोकरी) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे वडील विवेक शंकर गटणे (वय ७२, रा. महादेव गल्ली, दौंड) यांना मागील एक वर्षापासून आरोपींनी “फायनान्स कंपनीतील ओळखीच्या व्यक्तींमार्फत आर्थिक व्यवहार करून देतो” असे सांगून विश्वासात घेतले होते.

आरोपींनी वेळोवेळी त्यांच्याकडून रोख रक्कम, सोने तसेच इतर मौल्यवान वस्तू घेतल्या. मात्र, घेतलेली रक्कम व वस्तू परत न करता उलट टाळाटाळ केली. वारंवार मागणी करूनही पैसे व दागिने परत मिळत नसल्याने विवेक गटणे यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या सततच्या तणावातूनच विवेक गटणे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी त्यांनी एका वहीत संबंधित आरोपींची नावे लिहून ठेवल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्या आधारे पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात संजय भिमराव बारवकर, अरीफ शमशुद्दीन शेख, प्रकाश आबाजी भालेराव, अख्तर अहमद शेख, आदित्य सुधीर जगताप, शंकर रमेश वाघमारे, राजू भीमराव बारवकर यांच्यासह अन्य सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५१(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *