कळमेश्वर : फेटरी ते खडगाव गोंडखैरी बायपास मार्गावर रविवारी (११ मे) सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ५.३० वाजताच्या दरम्यान झायलो कार (क्र. एमएच १४ डीडीएक्स १६५३) आणि ईरटीगा कार (क्र. एमएच ४९ एई २९२४) यांच्यात फेटरी-खडगाव गोंडखैरी बायपास मार्गावर समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले.
या अपघातात इरफान उल्ला खान (वय ५२, रा. बंगाली पंजा, नागपूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातातील चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
अपघातानंतर दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
मृत इरफान उल्ला खान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मनोज काळबांडे व उपनिरीक्षक प्रवीण घोडाम करीत आहेत.




