प्रतिनिधी | शिरूर
शिरूर तालुक्यातील आण्णापुर गाव हद्दीतील येवलेमाथा परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर शिरूर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन, तयार दारू व भट्टी साहित्य जप्त केले. या कारवाईत एकूण ४३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेत झाडाझुडपात पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये सरकारी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार सागर कैलास बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब इब्राहिम गव्हाणे, सतपाल इब्राहिम गव्हाणे व रावसाहेब इब्राहिम गव्हाणे (सर्व रा. येवलेमाथा, आण्णापुर, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १० मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९.५० वाजण्याच्या सुमारास येवलेमाथा परिसरातील रस्त्यालगत असलेल्या शेतातील विहिरीजवळ काही जण गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने पंचांसह घटनास्थळी धाड टाकली असता आरोपी तीन दगडांच्या चुलीवर लोखंडी बॅरल ठेवून कच्च्या रसायनापासून गावठी दारू तयार करत असल्याचे निदर्शनास आले.
या ठिकाणी ४०० लिटर कच्चे रसायन भरलेले निळ्या रंगाचे दोन बॅरल, ४०० लिटर जळके रसायन असलेले काळ्या रंगाचे दोन बॅरल, भट्टीसाठी वापरले जाणारे लोखंडी ड्रम व स्टीलची चाटू, तसेच ३५ लिटर तयार हातभट्टी दारू असा मोठा साठा आढळून आला. ही दारू विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.
पोलिस पथक घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी पळ काढला. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले रसायन मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी व्यवसायाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सदर कारवाईत दाखल अंमलदार म्हणून पोहवा जगताप यांनी काम पाहिले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खटींग करीत आहेत. ही कारवाई शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.




