शिरूर (प्रतिनिधी): शिरूर तालुक्यातील न्हावरे-निर्वी मार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शोभा रामदास इथापे (वय 55, रा. लोहगाव, पुणे) या आपल्या पतीसोबत खांडवी येथून लोहगावकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. दिनांक 29 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास न्हावरे-निर्वी रस्त्यावर सिताराम सात्रस यांच्या घरासमोरील झाडाला कारची जोरदार धडक बसली.
या अपघातात शोभा इथापे व त्यांचे पती रामदास इथापे हे दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून शोभा इथापे यांना मृत घोषित केले. त्यांच्या पतीची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झालेले दिसून आले. त्यानंतर नातेवाईकांनी न्हावरे पोलीस चौकीत जाऊन घटनेची माहिती दिली.
या घटनेची नोंद पोलिसांकडे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अचानक झालेल्या या अपघातामुळे इथापे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




