सणसवाडी / जातेगाव खुर्द (ता. शिरूर) : प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील सणसवाडी व जातेगाव खुर्द परिसरात सामाजिक बांधिलकी जपत Foseco India Limited कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून उभारण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. सणसवाडी येथील माध्यमिक विद्यालयात नव्याने उभारण्यात आलेल्या आधुनिक सांस्कृतिक हॉलचे, तसेच जातेगाव खुर्द येथे सुरू करण्यात आलेल्या अद्ययावत लसीकरण केंद्र व जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्याला कंपनीच्या प्रतिनिधी सौ. प्राची सोनचल, असुंता मॅडम, महेंद्र दुतिया, महेश वैद्य, प्रकाश चिखले, युवराज भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सणसवाडी व जातेगाव खुर्द ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, रोटरी क्लबचे पदाधिकारी, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आली. सणसवाडी येथील माध्यमिक विद्यालयासाठी उभारण्यात आलेला सांस्कृतिक हॉल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या हॉलमुळे विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, स्पर्धा, कला सादरीकरणे आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
तसेच जातेगाव खुर्द येथे उभारण्यात आलेले अद्ययावत लसीकरण केंद्र ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यास मदत करणार आहे. नवजात बालकांचे लसीकरण, माता-बाल आरोग्य सेवा आणि विविध आरोग्य उपक्रम या केंद्रातून प्रभावीपणे राबवता येणार आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध होणार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
याशिवाय उभारण्यात आलेला जलशुद्धीकरण प्रकल्प गावकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होणार असून पाण्याशी संबंधित आजारांवरही नियंत्रण ठेवता येणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी बोलताना सांगितले की, उद्योग क्षेत्र आणि ग्रामीण समाज यांच्यातील सहकार्यामुळे अशा विकासकामांना गती मिळते. सामाजिक उत्तरदायित्व जपत ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी उद्योग समूहांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
Foseco India Limited कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून सणसवाडी व परिसरातील गावांमध्ये CSR अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि समाजहिताच्या विविध क्षेत्रांमध्ये कंपनीकडून सातत्याने योगदान दिले जात असून भविष्यातही अशा विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली.
या विकासकामांमुळे सणसवाडी व जातेगाव खुर्द परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी कंपनीचे आभार व्यक्त करत पुढील काळातही अशाच लोकोपयोगी प्रकल्पांची अपेक्षा व्यक्त केली.





