धक्कादायक प्रकार : परवानाधारक पिस्टलमधून हवेत गोळीबार; तिघांविरोधात गुन्हा दाखल

धक्कादायक प्रकार : परवानाधारक पिस्टलमधून हवेत गोळीबार; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Rjnews27marathi
शिरूर : शिरूर तालुक्यातील संवेदने गावच्या हद्दीत एका परवानाधारक पिस्टलमधून विनाकारण हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक गोविंद ज्ञानदेव खटिंग (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजेश सावलेराम लंगे (वय ४४) व स्वाती राजेश लंगे (वय ४०) हे दोघे सध्या भांडुप (मुंबई) येथे राहत असून त्यांचा मूळ पत्ता संवेदने (ता. शिरूर, जि. पुणे) असा आहे. तसेच विजय ज्योतिबा कसेकर (व्यवसाय – सेवानिवृत्त आर्मी, रा. भांडुप, मुंबई) यांचाही या प्रकरणात समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास संवेदने गावातील लंगे वस्ती परिसरात राजेश लंगे यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. सेवानिवृत्त आर्मी कर्मचारी विजय कसेकर यांच्याकडे असलेल्या परवानाधारक पिस्टलमधून त्यांनी राजेश लंगे व स्वाती लंगे यांना हवेत गोळीबार करण्यासाठी पिस्टल लोड करून दिल्याचे समोर आले आहे. संबंधित दोघांकडे शस्त्र वापरण्याचा कोणताही वैध परवाना नसतानाही त्यांनी हवेत गोळीबार केल्याने परिसरातील नागरिकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण झाला.
या घटनेमुळे गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परवानाधारक शस्त्र असलेल्या व्यक्तीने ते शस्त्र परवाना नसलेल्या व्यक्तीच्या ताब्यात देऊन वापरण्यास दिल्यामुळे इतरांच्या तसेच स्वतःच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खटिंग करत आहेत. गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार भगत यांनी केली असून प्रभारी पोलीस निरीक्षक केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *