पत्रकार मिलिंद शेंडगे यांना ‘संघनायक गौरव पुरस्कार’ प्रदान

पत्रकार मिलिंद शेंडगे यांना ‘संघनायक गौरव पुरस्कार’ प्रदान

पाटस प्रतिनिधी – योगेश राऊत

पाटस : सामाजिक बांधिलकी आणि निर्भीड पत्रकारितेचा वारसा जपणारे ‘दैनिक जनप्रवास’चे पत्रकार मिलिंद शेंडगे यांना ‘संघनायक गौरव पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. मूक नायक मैत्री संघ आणि दि पिपल्स वेलफेअर अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात शेंडगे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या ‘बहिष्कृत भारत’ पाक्षिकाच्या ९९ व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून तसेच ‘साप्ताहिक संघनायक’च्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त यवत येथील संत तुकाराम महाराज सभागृहात या विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
लोकनेते व माजी आमदार रमेश आप्पा थोरात आणि वीर गोविंद गोपाळ महार यांचे वंशज पांडुरंग गायकवाड यांच्या शुभहस्ते मिलिंद शेंडगे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पुणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असलेल्या मिलिंद शेंडगे यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पत्रकारिता करताना सत्तेचा किंवा कोणत्याही व्यक्तीचा प्रभाव न पडू देता, त्यांनी नेहमीच चुकीच्या गोष्टींवर परखड भाष्य केले आहे. गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे, सर्व धर्मीय सामाजिक उपक्रमांना प्रसिद्धी देणे आणि राजकीय घडामोडींचे निष्पक्ष विश्लेषण करणे ही त्यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये राहिली आहेत.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर शेंडगे भावूक झाले होते. “दैनिक जनप्रवासने मला जे स्वातंत्र्य दिले, त्यामळेच मी कोणाचीही भीडभाड न ठेवता सडेतोडपणे अन्यायाविरोधात लिहू शकलो,” असे त्यांनी यावेळी नमूद केले.
शेंडगे यांच्या या यशामुळे पाटस परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजाच्या हितासाठी त्यांची लेखणी अशीच तळपत राहो, अशा शुभेच्छा यावेळी मान्यवरांनी दिल्या.

हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझे कुटुंब, मित्र परिवार आणि पाटस मधील समस्त नागरिकांचा आहे. जनप्रवास वृत्तपत्र व्यवस्थापनाने मला दिलेल्या स्वातंत्र्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन.” — मिलिंद शेंडगे (पत्रकार, दैनिक जनप्रवास)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *