बाभुळसर बुद्रुकच्या युवकांचा आदर्श उपक्रम; विघ्नहर्ता शेतकरी बचत गटास ‘आदर्श उद्योजकता पुरस्कार’
अल्लाउद्दीन अलवी, पुणे जिल्हा प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथील विघ्नहर्ता शेतकरी बचत गटास आदर्श उद्योजकता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीरंग हॉस्पिटलचे अध्यक्ष धनंजय शिंदे पाटील यांच्या हस्ते विघ्नहर्ता शेतकरी बचत गटाचे चेअरमन शामराव मोहनराव ढमढेरे व सचिव किरण हनुमंत नागवडे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. धनंजय शिंदे पाटील, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी आप्पा फराटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष गोरक्षनाथ वेताळ, अखिल भारतीय पत्रकार संघाचे अनिल सोनवणे, शिरूर पंचायत समिती सदस्या संगीताताई फराटे, सरपंच दिपालीताई नागवडे, सरपंच निर्मलाताई फलके, ग्रामपंचायत सदस्या मनिषा नागवडे, शिवकृपा संकलन केंद्र अध्यक्ष संदीप उर्फ पप्पू शेठ फराटे, ह.भ.प. दादा महाराज सोनवणे, ह.भ.प. अंजलीताई ढवळे, दिलीप बापू नागवडे, महेंद्र नागवडे, सुनील ढमढेरे, रामदास नागवडे, पोलीस पाटील रणजीत पाडळे पाटील, संपादक रमेश बनसोडे, कार्यकारी संपादक विकास साळुंके, वृषभ नागवडे, अमित टेकवडे, अल्लाउद्दीन अलवी, किशोर नागवडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विघ्नहर्ता बचत गटाचा सारांश सांगताना गटाचे सदस्य अल्लाउद्दीन अलवी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सतरा युवकांनी एकत्र येत विघ्नहर्ता शेतकरी बचत गटाची स्थापना केली. सुरुवातीला दोन हजार रुपये मासिक बचत करत निधी जमा करण्यात आला. त्यातून प्रत्येक तीन सभासदांना प्रत्येकी पाच हजार रुपये कर्ज वितरण करण्यात आले. त्यानंतर बचतीची रक्कम वाढत जाऊन आज जवळपास ३० लाख रुपयांपर्यंत गटाची आर्थिक उलाढाल पोहोचली आहे.
या बचत गटाने दूध व्यवसायाला चालना देण्यासाठी स्वतःचा छोटा टेम्पो खरेदी करून दूध संकलन सुरू केले. सुरुवातीला सुमारे ७०० लिटर दूध संकलन करत मांडवगण फराटा येथील वाघेश्वर डेअरीला पुरवठा सुरू करण्यात आला. यासोबतच गाईंकरिता पशुखाद्य विभागही सुरू करून व्यवसायात वाढ करण्यात आली. या सर्व उपक्रमांचा अभ्यास करूनच RJNEWS चॅनेलने हा पुरस्कार प्रदान केल्याचे संपादक रमेश बनसोडे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, या सन्मानामुळे बचत गटातील सदस्यांना अधिक प्रोत्साहन मिळाले असून पुढील काळात मोठा प्रकल्प उभारण्याचा संकल्प असल्याचे विघ्नहर्ता शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष शामराव मोहनराव ढमढेरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.




