सरदवाडी येथे ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; चालकाविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा

सरदवाडी येथे ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; चालकाविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा
शिरूर प्रतिनिधी : विजय कांबळे 
शिरूर तालुक्यातील सरदवाडी गावाच्या हद्दीत राजस्थान ढाब्याच्या पार्किंगमध्ये घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश आसाराम साठे (वय 29, रा. मालगाय, ता. पस्तूर, जि. जालना) हे राजस्थान ढाब्याच्या पार्किंगमध्ये ट्रकखाली झोपलेले असताना हा अपघात घडला. दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटेच्या सुमारास ट्रक चालक बालसुब्रम्हण्यम मुर्गेशन (रा. सालकाडू, मेटूपट्टी, ता. मुसरी, जि. तिरुचिरापल्ली, तामिळनाडू) याने आपल्या ताब्यातील ट्रक (क्रमांक TN-88-M-1864) निष्काळजीपणे चालवत पार्किंगमधून वळवला.
यावेळी ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली झोपलेल्या योगेश साठे यांच्या कंबरेखालील भागावरून चाक गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून निघून गेल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिरूर पोलीस स्टेशनचे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र किसन बनकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणात पोलीस हवालदार जगताप यांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तर शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या देखरेखीखाली तपासाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, ढाब्यांच्या परिसरात ट्रक चालक व कामगार झोपण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *