शिरूरच्या बोरा महाविद्यालयात रानभाज्या व भरड धान्य महोत्सव २०२५ उत्साहात संपन्न

शिरूरच्या बोरा महाविद्यालयात रानभाज्या व भरड धान्य महोत्सव २०२५ उत्साहात संपन्न

शिरूर, प्रतिनिधी – rjnews27marathi.com
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, शिरूर येथे वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने “रानभाज्या व भरड धान्य महोत्सव २०२५” तसेच बीज राखी प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. ग्रामीण परंपरा, स्थानिक अन्नधान्य संवर्धन आणि आरोग्यदायी आहार यांचा संदेश या महोत्सवाद्वारे देण्यात आला.

महोत्सवाचे उद्घाटन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांच्या हस्ते झाले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, “आरोग्य संपन्न आयुष्यासाठी रानभाज्या व भरड धान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने यांचे संवर्धन करून पुढील पिढीकडे हा वारसा जपण्यासाठी देणे गरजेचे आहे.”

या महोत्सवात विद्यार्थ्यांनी ६३ पेक्षा अधिक रानभाज्या व भरड धान्यांचे फलक, माहिती व पाककृती सादर केल्या. फांद भाजी, टाकळा, सराटा, बांबू, अंबाडी, सुरण, तोंडली, शेवगा, उंबर यांसह अनेक रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे नाचणी, ज्वारी, बाजरी, राळा, सावा, राजगिरा यांसारख्या भरड धान्यांपासून तयार केलेले विविध पदार्थ व उत्पादनांची विक्रीही करण्यात आली. विशेष म्हणजे वनस्पतीशास्त्र विभागातील एका विद्यार्थ्याने नाचणीपासून बिस्किटे व इतर उत्पादनांचा स्टार्टअप सुरू केल्याचे पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले.

महोत्सवात विद्यार्थिनींनी पर्यावरणपूरक बीज राख्या तयार केल्या तर देशी वाणांची बीज बँक प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. परंपरेला विज्ञानाची जोड देणारा हा उपक्रम पाहुण्यांच्या विशेष आकर्षणाचा ठरला.

कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एच.एस. जाधव, विज्ञानविद्या शाखा व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नारायण घनगावकर यांनी आपली मते व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ. अयोध्या क्षीरसागर यांनी केले, तर सूत्रसंचालन साक्षी भोसले व आभार प्रदर्शन डॉ. विकास नायकवडी यांनी केले.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पाककृतींचे परीक्षण प्रा. अशोक चौधरी व प्रा. दिपाली पवार यांनी केले व उत्तम सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी बनविलेल्या पर्यावरणपूरक बीज राख्या आणि देशी वाणांची बीज बँक हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. संदीप देवीकर, प्रा. अभिजीत घावटे, डॉ. हर्षद शिर्के, प्रा. शारदा थोरात, प्रा. मीरा शिंदे, रियाज इनामदार, हनुमंत करपे, रोहित वाळके, ऋषिकेश लबडे, निखिल मगर व दुर्गेश बारस्कर यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *